Sunday, 10 April 2011

कविता

कवितांचे पुस्तक वाचत असता 
कधीतरी विचार करते
माझ्याही मानता याच भावना 
मग कविंनाच का कविता सुचते

असा विचार करता करता
काही ओळी मनात फुगतात
पण साबणाच्या फुग्यासारख्या
क्षणार्धात मनातच फुटतात

जड जड शब्द, सुंदर उपमा
वेळीच कधीही आठवत नाहीत
पुस्तकी भाषेत चार ओळी 
कधीतरी लिहिते घाईत

कविता म्हणून नाव द्यावे 
तर रस व लयीची अभाव असतो
पण परिच्छेद याला म्हणावा
तर वाचताना एक ठेका जाणवतो

कधीतरी जमलीच छान
तर इतरांना वाचून दाखवते
पण त्यांच्या सुंदर कवितांसमोर
माझी कविता हिरमुसते

म्हणूनच सध्या सुचले काही
तर डायरीमध्ये लिहून ठेवते
कोणी कधी वाचलेच तर
कविता म्हणून बाहेर येते

मला जे आवडत नाही
लोक त्याची वाहवा करतात
मग माझ्या मनात आनंदाचे
गर्वाचेही झुले झुलतात

झुलता झुलता अनेक कविता
झरझर झरझर लिहून काढते
आणि थोड्याच दिवसात माझी ही
प्रतिभेची गाडी बंद पडते

मग परत इतर कवींच्या
कवितांमध्ये मन रमवते 
माझ्याही मानता याच भावना 
मग कविंनाच का कविता सुचते!!!!