आपल्या तेजाने धरेवर राज्य करून,
रवी आता अज्ञातवासाची कास धरून,
मेघामित्राच्या श्यामदेहाआड लपून
जणू विश्रांती घेऊ लागलाय......
ढगांच्या मायाछत्राची सावली झाली
विजांची मिरवणूक मनोरंजनासाठी आली
वार्यावर स्वार वैशाखाची स्वारी निघाली
जणू आषाढाला मार्ग मोकळा झालाय.....
भोवरा हवेचा भिरभिरत भिरभिरत येतो,
घोंगावत सरसरत पानांशी खेळ खेळतो
वादळाचे रूप घेऊन मेघांना आवाहन देतो
जणू त्यांना बरसण्यासाठी साद घालतोय.....
समुद्राची आर्द्र माया पोटाशी घेऊन
तिच्या गर्द आवेगाने अनावर होऊन
वादळाच्या अह्वानात्मक रूपाला भुलून
जणू मेघाच्या अश्रूंचा बांधच फुटलाय.....
टीप टीप करत सुरुवात सरीने होते
झरझर मग ही धारा बरसू लागते
सपसप आसवांना वाट करून देते
जणू भावनाच मेघाच्या भरून वाहतायत.....
गर्जून बरसून मेघही थकून जातो
वाऱ्याचा भोवराही गरगरून थांबतो
मातीचा दरवळ पाने हिरवी करू लागतो
जणू आवेग मेघाचा शांत होतोय....
पण आकाशातली गडद छाया पुसलेली नाही
सूर्याची लापाछपी अजून थांबलेली नाही
हिरवाईची हौस अजून भागलेली नाही
जणू मेघ अजूनही मनात आर्द्रता साठवतोय......