Monday, 28 March 2011

झाड!!!!!

काल पर्यंत हे झाड दुःखी होतं
सगळी पानं झडून गेली होती 
कोणत्याही जीवांची त्यावर वस्ती नव्हती 
उभं होतं ते बोडकं त्या हिरवाईच्या मध्ये 

आज ते झाड ओळखूच येत नाहीये!
जणू स्पर्श झालाय त्याला परिसाचा 
काल होती चिन्ह नाजूक हसणाऱ्या पालवीची 
आज मात्र ते हिरव्या पानांनी दिलखुलास हसतंय
कधी न नटलेलं ते, आज बहराचा शृंगार करून सजलंय
खरं तर हरवलंय ते हिरवाईत आता 

कारण त्याच्या फुलण्यामागे, ते एक घरट बांधणार छोटंसं पाखरू 
जशा त्याने आणलेल्या कड्या आकार घेत होत्या 
तसा त्या झाडाचा अहं तयार होत होता
शेवटी त्या पाखराने ती सगळी नटवी झाडं सोडून त्याला निवडलं होतं!!

आता ते पाखरू आपला संसार थाटणार.......

पण तेवढ्यात काहीतरी निसटल,
एक पान खाली पडलं
पण झाडाच्या त्या मानी मनाला, कुठे त्याचं सूतक?
एक नाही तर हजार आहेत!!!

पण हळूहळू त्या हजारांची शंभर, दहा, एक अशी गळती झाली,  
आणि राहिलं ते परत बोडकं उभं 
निसर्गतः गेला ते पाखरू आपलं घरट आणि झाड तिथेच सोडून....
त्या बहरलेल्या बोडक्याचा बहार लुटून ....

ते पहिलं पडलेलं पान म्हणालं,....
ती तुझ्यावर चढलेली नशा त्या पाखराची नव्हती , 
माझी होती....
तुला फुटलेल्या पहिल्या पानाची 
त्यावेळी नाही कळलं पण आज कळतंय तुला 
आसरा दे, खत बनून येईल तुझ्या मदतीला 

बोडक्या झाडाने ऐकला ते, आणि निराश न होतां उभं राहिलं...

खाली ते पान झिजत होतं,
पण त्या झाडाच्या मनात ते पाखरुच उडत होतं !!!!!!

Sunday, 27 March 2011

क्षण

क्षण एक तो अगदी एकटा त्या दरीच्या काठाशी बसणारा
हलक्याशा या झुळुकीबरोबर स्वप्नात उडून जाणारा

क्षण एक तो स्वप्नातला नकळत हरवूनी गेलेला 
अजाण एका चेहऱ्याच्या विचारांमध्ये गुंगलेला 

क्षण एक तो अजाण असा चाहूल अजाण मनातली 
कोण कारे तो मनात चुळबुळ आनंदाची गोड गुदगुली

क्षण एक तो आनंदाचा यौवन हळूच फुलवणारा
बालपणीच्या आठवणी हरवून तारुण्याने मोहरणारा

क्षण एक तो मोहरता प्रीतीची जादू अनुभवतो
प्रेम नाही हं! म्हणताना चटकन स्वतःवरच हसतो

क्षण एक तो हसरा बांधतो स्वप्नांचे मनोरे
उंचीला मर्यादा समजुतीने स्वप्नांचे ते बुट्केच बरे

क्षण एक तो समजूतदार विवेकानेच विचार करतो
सत्याच्या या दुनियेमध्ये परतण्यासही सहाय्य करतो

क्षण एक तो परतणारा शांत मनाने उठून वळतो
मागे वळताच बघतो तर तोच चेहरा समोर दिसतो

क्षण एक हसऱ्या चेहऱ्याचा स्वप्नांचे महत्व पटवून जातो
मर्यादांचे भान करवुनी एकट्याला दुसऱ्याची साथ देतो

क्षण एक तो नाही एकटा सोबत आहे कुणाची
दरीच्या काठी वाऱ्यावरती आता दोन क्षणांची .. .. .. . . . .. . 

Sunday, 20 March 2011

Mothi Hotana

मऊ स्वप्नांच्या दुलाईमध्ये
मायेच्या कुशीत झोपणे ते
आधाराच्या छत्राखाली 
खुशीत निर्धास्त हसणे ते

छकुड़ी छोटी खळखळणारी
स्त्री या मनात अवतरली
विरळ माया विरळ आधार 
खंबीर पाठींबा असे जरी

मोठी स्वप्न खरी होताना
बालपण मागे सरते ग
क्षितिजाला खुशाल टेकती हात पण 
घराची वेस सुटते ग

दूर आईहून रहावेना
जरी दिवस दूरीचे नसती फार
पण मोठी हळूच होताना 
दुखाला या येते धार

वाटते कि पेलून पहावी 
जबाबदारी कोणतीही 
वाटते जगामध्ये पुढे राहावे 
ठेवावी न उणीव कसलीही

निघताना या वाटेवर
मायेच्या नजरेला दिली साद
त्यामध्ये उधळत होती कौतुके
तीच होती माझी पहिली दाद

मज कळे की वाट ही आहे 
बहु कंटके थोडी फुले
आईचा हात जोवर या माथी
यशाचे झुलत जाईन झुले