Wednesday, 28 November 2012

मन

मन जसे एक छोटेसे पाखरू ..... आकाराचे बंधन तोडून आकाशाला गवसणी घालते
पंखांची  ताकद संपून जाते ..... तरी उत्साहाच्या जोरावर भरारी घेते

मन जशी एक मोहरती वेल .......सौंदर्याने फुलू पाहते
तिच्या सुंदरतेची खरी ओळख ..... तिच्या अधावृक्षाने होते

मन जशी एक उधाण लाट ..... समुद्राच्या गहिराइतुन  जन्म घेते
खळखळत किनाऱ्यापाशी येते ...... अन शांत होऊन वाळूत मिसळते

मन जसे मंद वाहणारा वारा ....... प्रसन्नता पसरवतो
सुगंधी फुलांचा सहवास मिळवून ....... वातावरण मोहरवतो

मन जसे मोकळे आकाश .... निळाईने  स्वच्छं धुतलेलं
ढगांचे मळभ पुसून टाकून ..... निळ्या रंगाने रंगलेलं

मन जसे पतंगाचा मांजा ....... फिर्कीतून सुटून गगनाकडे धावतो
पण जरी मोकळा होऊ पाहतो......फिर्कीशी नातं धरून बसतो

मन जसे एक शिम्प्ल्याचे कवच ..... अश्रुंचे कानही जपून ठेवते
पण भावनेच्या समुद्रतळाशी ...... या अश्रुंचे मोती फुलवते......

 

Saturday, 7 January 2012

आज वाटते मनमुराद हसत राहावे

आज वाटते मनमुराद हसत राहावे

खरे तर खास असे काहीच घडले नाही
कोणी हसून बोलले नाही,
कोणी वळून पाहिले नाही,
कोणी प्रेमाच्या वाटेवरती चालावयास नेलेही नाही
पण तरीही वाटे स्वप्नांचे झुले झुलवत राहावे
आज वाटते मनमुराद हसत राहावे

न कुठले मोठे यश मिळवले
न कुणाला द्वंद्वात हरवले
न परीक्षेत झेंडे गाढले
न स्पर्धेत कोणत्या नाव काढले
काही न करता वाटते स्वतःस जेता म्हणवावे
आज वाटते मनमुराद हसत राहावे

रोजचेच सारे वेगळे आज काहीही नाही
त्याच मैत्रिणी तीच प्रेमळ मायेची आई
त्याच कामाला जाण्याची मरणाची घाई
अन त्याच ठिकाणाहून सुटण्याची धडपड बाई
पण वाटते आज या सर्वांबरोबर जगून पाहावे
आज वाटते मनमुराद हसत राहावे

बहुतेक मला आज एक रहस्य कळले
जवळच होते पण मला आज सापडले
सुखाच्या शोधात किती सगळीकडे धावले
काखेत कळसे तरी गावाला वळसे घातले
आज वाटते जवळचे क्षण जपून ठेवावे 
आज वाटते मनमुराद हसत राहावे

दुखाची वळणे येताच राहणार
दरीत कोसळायची भीती वाटत राहणार
वाईट प्रवृत्ती व्यक्ती बनून समोर येणार
आपणही क्वचित कधीतरी वाईट वागणार
पण वाटते  हे नाकारात्मक्पण तत्काळ पळावे
आज वाटते मनमुराद हसत राहावे