Wednesday, 28 December 2011

खळ`ळं

खळ`ळं .......... आणि कळत की काचेचा चक्काचूर झालाय
स्वप्नं बनून जे काही डोळ्यात चमकत होतं तेच आता थेंबा थेंबाने धो धो वाहतंय पहा

स्वप्नं आपण रंगवायची, त्यांची घर आपण बांधायची, अपेक्षांची तोरणं आपण सजवायची
पण ते ओरबाडून, खरवडून टाकतं कोणी तरी अनोळखी व्यक्ती

त्या व्यक्तीचा ना आपण द्वेष केला, जरी त्याने केला असेल आपल्या वर्णाचा
त्या व्यक्तीचा न आपण कधी राग धरला, पण त्याने धरला असेल आपल्या देशाचा
त्या व्यक्तीबद्दल न कधी आपण वाईट बोललो, पण त्याने घातल्या असतील आपल्याला मनसोक्त शिव्या
त्या व्यक्तीचा न आपल्याला नावही माहित, आणि त्यालाही नक्कीच माहित नसणार आपलं

मग कोणी हक्क दिला त्याला हे ठरवण्याचा कि माझं आयुष्य आज इथेच संपणार आहे,
मग त्याला का वाटले असावे कि आपल्या मनाच्या निष्कलंक काचेचे असे हजार तुकडे करून, आपल्या आप्तांच्या डोळ्यात टोचवावे
मग त्याला अशी इच्छा का व्हावी कि ज्या व्यक्तीचे नाव त्याला माहित नाही, त्याचे नाव या जगाच्या पाटीवरून पुसून टाकावे.

हा हक्क दिला त्याला माणुसकीच्या अभावाने, अहंकाराच्या खोट्या हातोडीने जी हाणून त्याने आपले हे सुंदर काचेचे स्वप्नं असे उध्वस्त केले ........... खळ`ळं 

Monday, 5 December 2011

गार कॉफी चे कप

भेटायचो रोज मैत्रीकारिता, ओढ गप्पांच्या रंगीत सत्रांची
नजरेला नजर मिळवत, दिलखुलास खळखळणाऱ्या हास्याची

अशाच एका सत्रात विनोदाची बरसात चालू होती
एकमेकांचे स्वर ऐकता ऐकता, टेबलावरची कॉफी गार झाली होती

हळूच, विनोदाची सांगत म्हणून, टाळी साठी हात पुढे आले
हाताला हात मिळताच एक नवे सत्र सुरु झाले

किती गार कॉफी चे कप आजपर्यंत या टेबलावर असत
पण आज नंतर त्यांच्या सोबत हलके स्पर्श खुदकन हसत

Tuesday, 30 August 2011

चोर कप्प्यात.....

किती गोष्टी असतात ना  अशा, ज्या मनाच्या कपाटात एका चोर कप्प्यात लपवून ठेवलेल्या असतात !
खरतर आपणही विसरून गेलेलो असतो या गोष्टींबद्दल, पण त्यांचं असणं मात्र असताच, अगदी अपरिहार्य!
हळुवार पणे उघडून पाहूया! काय काय असेल हो त्यात?

कोणाबद्दल राग तर कोणाबद्दल अनुराग!
एखाद्याशी झालेल्या कडाक्याच्या भांडणाची धूसफूस, एखाद्या सॉलिड वाटलेल्या व्यक्तीबद्दलची कुजबुज
एखादा मोकळ्या मनाने गडबडा लोळून हसवणारा क्षण, तर  एखादा एकटाच ढसाढसा रडताना गळलेल्या अश्रूंचा कण

कधीतरी जुन्या मित्राला खूप वर्षांनी भेटल्यावर केलेलं आश्चर्याच hi !
तर  कधी एखाद्या जिवलग मैत्रिणीला निरोप देताना खोटा हसत केलेलं रडवेला bye!

खूप  राग येऊन  भावाशी  केलेली  जोरदार  मारामारी , तर कधी चूक  नसतानाही  मनवायला  म्हटलेलं  हलक sorry!  
कुणाचीतरी उगाच आलेली आठवण, नाहीतर  विसरायला हवी अशी हुंदक्यांची साठवण.
एखाद्या पिक्चर मधला एखादा झकास  stylish  dialogue, नाहीतर एखाद्या विचारवंताच्या  नाटकातला  अंतर्मुख  करणारा  monologue.
  
पटकन  आवडलेल्या  आणि  लक्षात  राहिलेल्या  काही  चारोळ्या , तर कधी मोर्च्यातल्या  लोकांच्या,  मनाला  भिडलेल्या  आरोळ्या 
 
नाही  म्हणता  म्हणता केवढा  काय काय आठवलं , आत्ता  कळला  इतके  वर्ष  काय साठवलं !   
कधी मारा  एक  फेर  फटका  आपल्याच  मनात, आणि जाणून  घ्या  कुठल्या  गोष्टी खरच  भावल्या  होत्या ,   नाहीतर बाहेरचं मन  आहेच  जे  डोक्याच्या  बरोबर  गोष्टींचे  दोनच  वर्ग  करतं,  व्यवहारोपयोगी  त्या  खऱ्या  आणि बाकी  सर्व  खोट्या!    

Friday, 3 June 2011

मेघाचा आवेग....

आपल्या तेजाने धरेवर राज्य करून,
रवी आता अज्ञातवासाची कास धरून,
मेघामित्राच्या श्यामदेहाआड लपून
जणू विश्रांती घेऊ लागलाय......

ढगांच्या मायाछत्राची सावली झाली
विजांची मिरवणूक मनोरंजनासाठी आली
वार्यावर स्वार वैशाखाची स्वारी निघाली
जणू आषाढाला मार्ग मोकळा झालाय.....

भोवरा हवेचा भिरभिरत भिरभिरत येतो,
घोंगावत सरसरत पानांशी खेळ खेळतो
वादळाचे रूप घेऊन मेघांना आवाहन देतो
जणू त्यांना बरसण्यासाठी साद घालतोय.....

समुद्राची आर्द्र माया पोटाशी घेऊन
तिच्या गर्द आवेगाने अनावर होऊन
वादळाच्या अह्वानात्मक रूपाला भुलून
जणू मेघाच्या अश्रूंचा बांधच फुटलाय.....

टीप टीप करत सुरुवात सरीने होते
झरझर मग ही धारा बरसू लागते
सपसप आसवांना वाट करून देते
जणू भावनाच मेघाच्या भरून वाहतायत.....

गर्जून बरसून मेघही थकून जातो
वाऱ्याचा भोवराही गरगरून थांबतो
मातीचा दरवळ पाने हिरवी करू लागतो 
जणू आवेग मेघाचा शांत होतोय....

पण आकाशातली गडद छाया पुसलेली नाही
सूर्याची लापाछपी अजून थांबलेली नाही
हिरवाईची हौस अजून भागलेली नाही
जणू मेघ अजूनही मनात आर्द्रता साठवतोय......


Sunday, 15 May 2011

नको तेव्हा......

काही गोष्टी नको त्या वेळीच का घडतात?
पाहिजे असतात तेव्हा दूरच राहतात

एखादी वस्तू गरजेच्या वेळीच लपते
नको तेव्हा नजरेसमोर नाचत राहते

कुठे जायला निघाले की गाडीची किल्ली हरवते
आईचा ओरडा बसला की हळूच बाहेर निघते

उशीर झाला कधी की बरोबर फोन वाजतो 
कंटाळ्याच्या साम्राज्यात मात्र शांत बसून असतो

काही काम आलं महत्वाचं की ह्रिथिकचा पिक्चर लागतो
एरवी टीव्ही वर फक्त गोविंदा आणि मिथुनच नाचतो

अभ्यासाचे पुस्तक घेतला की कविता स्फुरायला लागतात
गणिते सोडवण्या ऐवजी शब्दच उमटू लागतात

खरेदी करूया म्हटले तर एक कपडा आवडत नाही
पैसे नसले खिशात की डोळ्यात भरते सगळे काही

में और मेरी तन्हाई दोघीही जेव्हा बोर होतो
तेव्हाच सगळ्यांना कामात गढण्याचा मूड येतो

मग माझ्या डोक्यावर जेव्हा अर्जंट कामाची तलवार तरंगते
तेव्हा गप्पा मारण्या करिता मित्र मैत्रिणींची हाक येते

या गोष्टींना पण ना! टाईम सेन्स शिकवायला हवा
कारण नको तेव्हा वादळ होतो एरवी पाऊस हवा हवा

Sunday, 10 April 2011

कविता

कवितांचे पुस्तक वाचत असता 
कधीतरी विचार करते
माझ्याही मानता याच भावना 
मग कविंनाच का कविता सुचते

असा विचार करता करता
काही ओळी मनात फुगतात
पण साबणाच्या फुग्यासारख्या
क्षणार्धात मनातच फुटतात

जड जड शब्द, सुंदर उपमा
वेळीच कधीही आठवत नाहीत
पुस्तकी भाषेत चार ओळी 
कधीतरी लिहिते घाईत

कविता म्हणून नाव द्यावे 
तर रस व लयीची अभाव असतो
पण परिच्छेद याला म्हणावा
तर वाचताना एक ठेका जाणवतो

कधीतरी जमलीच छान
तर इतरांना वाचून दाखवते
पण त्यांच्या सुंदर कवितांसमोर
माझी कविता हिरमुसते

म्हणूनच सध्या सुचले काही
तर डायरीमध्ये लिहून ठेवते
कोणी कधी वाचलेच तर
कविता म्हणून बाहेर येते

मला जे आवडत नाही
लोक त्याची वाहवा करतात
मग माझ्या मनात आनंदाचे
गर्वाचेही झुले झुलतात

झुलता झुलता अनेक कविता
झरझर झरझर लिहून काढते
आणि थोड्याच दिवसात माझी ही
प्रतिभेची गाडी बंद पडते

मग परत इतर कवींच्या
कवितांमध्ये मन रमवते 
माझ्याही मानता याच भावना 
मग कविंनाच का कविता सुचते!!!!

Monday, 28 March 2011

झाड!!!!!

काल पर्यंत हे झाड दुःखी होतं
सगळी पानं झडून गेली होती 
कोणत्याही जीवांची त्यावर वस्ती नव्हती 
उभं होतं ते बोडकं त्या हिरवाईच्या मध्ये 

आज ते झाड ओळखूच येत नाहीये!
जणू स्पर्श झालाय त्याला परिसाचा 
काल होती चिन्ह नाजूक हसणाऱ्या पालवीची 
आज मात्र ते हिरव्या पानांनी दिलखुलास हसतंय
कधी न नटलेलं ते, आज बहराचा शृंगार करून सजलंय
खरं तर हरवलंय ते हिरवाईत आता 

कारण त्याच्या फुलण्यामागे, ते एक घरट बांधणार छोटंसं पाखरू 
जशा त्याने आणलेल्या कड्या आकार घेत होत्या 
तसा त्या झाडाचा अहं तयार होत होता
शेवटी त्या पाखराने ती सगळी नटवी झाडं सोडून त्याला निवडलं होतं!!

आता ते पाखरू आपला संसार थाटणार.......

पण तेवढ्यात काहीतरी निसटल,
एक पान खाली पडलं
पण झाडाच्या त्या मानी मनाला, कुठे त्याचं सूतक?
एक नाही तर हजार आहेत!!!

पण हळूहळू त्या हजारांची शंभर, दहा, एक अशी गळती झाली,  
आणि राहिलं ते परत बोडकं उभं 
निसर्गतः गेला ते पाखरू आपलं घरट आणि झाड तिथेच सोडून....
त्या बहरलेल्या बोडक्याचा बहार लुटून ....

ते पहिलं पडलेलं पान म्हणालं,....
ती तुझ्यावर चढलेली नशा त्या पाखराची नव्हती , 
माझी होती....
तुला फुटलेल्या पहिल्या पानाची 
त्यावेळी नाही कळलं पण आज कळतंय तुला 
आसरा दे, खत बनून येईल तुझ्या मदतीला 

बोडक्या झाडाने ऐकला ते, आणि निराश न होतां उभं राहिलं...

खाली ते पान झिजत होतं,
पण त्या झाडाच्या मनात ते पाखरुच उडत होतं !!!!!!

Sunday, 27 March 2011

क्षण

क्षण एक तो अगदी एकटा त्या दरीच्या काठाशी बसणारा
हलक्याशा या झुळुकीबरोबर स्वप्नात उडून जाणारा

क्षण एक तो स्वप्नातला नकळत हरवूनी गेलेला 
अजाण एका चेहऱ्याच्या विचारांमध्ये गुंगलेला 

क्षण एक तो अजाण असा चाहूल अजाण मनातली 
कोण कारे तो मनात चुळबुळ आनंदाची गोड गुदगुली

क्षण एक तो आनंदाचा यौवन हळूच फुलवणारा
बालपणीच्या आठवणी हरवून तारुण्याने मोहरणारा

क्षण एक तो मोहरता प्रीतीची जादू अनुभवतो
प्रेम नाही हं! म्हणताना चटकन स्वतःवरच हसतो

क्षण एक तो हसरा बांधतो स्वप्नांचे मनोरे
उंचीला मर्यादा समजुतीने स्वप्नांचे ते बुट्केच बरे

क्षण एक तो समजूतदार विवेकानेच विचार करतो
सत्याच्या या दुनियेमध्ये परतण्यासही सहाय्य करतो

क्षण एक तो परतणारा शांत मनाने उठून वळतो
मागे वळताच बघतो तर तोच चेहरा समोर दिसतो

क्षण एक हसऱ्या चेहऱ्याचा स्वप्नांचे महत्व पटवून जातो
मर्यादांचे भान करवुनी एकट्याला दुसऱ्याची साथ देतो

क्षण एक तो नाही एकटा सोबत आहे कुणाची
दरीच्या काठी वाऱ्यावरती आता दोन क्षणांची .. .. .. . . . .. . 

Sunday, 20 March 2011

Mothi Hotana

मऊ स्वप्नांच्या दुलाईमध्ये
मायेच्या कुशीत झोपणे ते
आधाराच्या छत्राखाली 
खुशीत निर्धास्त हसणे ते

छकुड़ी छोटी खळखळणारी
स्त्री या मनात अवतरली
विरळ माया विरळ आधार 
खंबीर पाठींबा असे जरी

मोठी स्वप्न खरी होताना
बालपण मागे सरते ग
क्षितिजाला खुशाल टेकती हात पण 
घराची वेस सुटते ग

दूर आईहून रहावेना
जरी दिवस दूरीचे नसती फार
पण मोठी हळूच होताना 
दुखाला या येते धार

वाटते कि पेलून पहावी 
जबाबदारी कोणतीही 
वाटते जगामध्ये पुढे राहावे 
ठेवावी न उणीव कसलीही

निघताना या वाटेवर
मायेच्या नजरेला दिली साद
त्यामध्ये उधळत होती कौतुके
तीच होती माझी पहिली दाद

मज कळे की वाट ही आहे 
बहु कंटके थोडी फुले
आईचा हात जोवर या माथी
यशाचे झुलत जाईन झुले